लेखक: आनंद मेश्राम
(दिसंबर २०१२)
वस्तू जी फ़क्त एक साधन आहे; आजच्या काळात त्याला लोकं जीवन मानतात. आधुनिकतेच्या तमाशात लोकं सहज सत्याच्या एवढ्या दूर ढकलल्या गेलेत की त्याचा साधा उल्लेख सुद्धा एका क्रांतीपेक्षा कमी नाही वाटत. मूर्खांच्या बाजारात दृष्टी विकृत होऊन सर्व बेभान झालेत, आणि जीवन सोडून साधनांमागे धावताहेत. जीवन वास्तव काय असते याबद्दल तसूभर कल्पना नसल्यामुळे लोकं अकलेचे हास्यास्पद स्तर ओलांडून किळसपणा गाठतात. अशावेळेस सहानुभूती न जोपासता करुणा ठेवणे उपयोगी ठरते, कारण वेडेपणा संसर्गजन्य असून जंगलात पेटलेल्या आगीसारखं चोहोबाजूला ठिणग्या फेकत पसरते.
कशाला जीवनाचं उद्देश्य म्हणावं आणि कोणत्या वस्तूंना उद्देश्य प्राप्त करण्याचं साधन हे वर्गीकरण एवढं अवघड का? तुमचं घर, वाहन, टीव्ही, मोबाईल, कपडे हे जीवनाचे उद्देश्य आहेत की साधनं? कि अक्षरशः जीवनंच? नातं, नौकरी-व्यवसाय, पैसे हे जीवनाचे लक्ष्य म्हणावं की साधन? आधुनिक (विकृत) जगाचे संस्कार घेऊन पुढारलेला मॉडर्न (भान हरपला) व्यक्ती नेमकं कशाला जीवन मानतात, जगण्याचं उद्देश्य काय बनवतात आणि काय साधन; हे त्याचं त्यालाच ठाऊक! मूर्खतेची सीमा शोधणे हे स्वतःला नैराश्यात ढकलण्याचं खेळ आहे.
साधनं गोळा करत असता भान विसरून अर्जन करण्याचं कारण विसरणे हा असा रोग आहे जे बहुतेक सर्वांना असेल. कारण शाळा, ट्युशन, कॉलेज कुठेही लोकांना “जीवन” नावाचं विषयच शिकवले जात नाही. किती अंकाने पास किव्वा नापास होत असल्याचं निकाल कोण लावणार? त्याउलट मुलांची जीवनाकडे बघण्याची जन्मजात कुवत संपवून, सामान्य समजबुद्धिकडे दुर्लक्ष करवून, डोळ्यांवर काळी पट्टी बांधून एक उपयोगी आंधळा बैल बनवण्याची प्रक्रिया राबवली जाते.
नाकातून दोरी ओढून बहुतेक बैल स्वतःला बंडीला बांधून तारुण्याची सुरुवात करतात. तर उरलेले काही निर्भिक बैल एकटे पाठीवर ओझं घेऊन वर्तुळाकार यात्रेत निघतात. काही वर्षे घाम गाळल्यावर पदोन्नती होते आणि बक्षीसरूपी दुप्पट ओझं लादल्या जाते. मग चौपट. शेवटी मनात गोंधळ आणि तोंडातून फेस गाळत बैलं मातीत लोळतात आणि स्पर्धा संपण्याची शिटी वाजते.
खरंच जगण्याची ही कला असावी? डोळ्यावरून काळी पट्टी काढून जर बैलाने आरश्यात पाहिलं तर कदाचित तो बैल किव्वा गाय नसून एक मनुष्य असल्याची प्रचिती होईल। मनुष्य असणे नक्की काय असते? त्याची विशेषता, मूळ स्वभाव, नैसर्गिक सामर्थ्य, उत्क्रांतीची अंतिम शक्यता काय हे जाणण्याची साहजिक उत्सुकता त्यानंतर त्याला उद्भवेल.
आयुष्यात गोळा केलेल्या वस्तू हे निव्वळ साधनं असून अक्षरशः जीवन नाही, किव्वा त्याचा उद्देश्य ही नाही हे त्याला लवकरचं कळते. मनुष्य असल्याचे आरसारूपी अभिमान जर खाली पडून फुटला तर फ़क्त भौतिक वस्तूच नाही, तुमचं शरीर, मन, बुद्धी हे सुद्धा केवळ गोळा केलेल्या वस्तूच असल्याचं झळकते. वस्तू ज्यांना आहार देऊन विकास घडवून छान साधन बनवण्याचं प्रयत्न तुम्ही आयुष्यभर केलं. साधन ‘असं पाहिजे-तसं नाही’ असल्या आंधळ्या अपेक्षांच्या मगरमिठीतून स्वतःला काढून, सत्य विकृत न होऊ देता केवळ त्याचं अनुकरण करत गेलं, तर शेवटी अगदी “मनुष्यता” सुद्धा केवळ एक साधन, एक वाहन असल्याचं सत्य प्रकटते. जीवन आणि त्याचं उद्देश्य हे बैलांचे नव्हे तर मनुष्याचे प्रश्न आहेत ज्याचे उत्तरं सांगता-शिकवता येत नाही; प्रत्येकाला स्वतःच बघावं लागतं.
बालचंचल मन उत्तरं शोधण्याच्या तयारीत पूर्ण जोमाने जुंपले असते. बालपणाची सुप्त प्रवृत्तीच असते की आवश्यक ऊर्जा, बुद्धी आणि स्थिरता पावून निसर्गाचे सर्व उत्तरं मिळवून जीवन सार्थक करावं. पण ह्या बेभान जगात शिकत असता चंचल बालपणाहून स्थिर प्रौढता असं रूपांतरण घडूनच येत नाही. शरीर वाढून अगदी सैल होत असतांना सुद्धा अर्जन करण्याची चंचलवृत्ती जात नाही आणि प्रौढत्वाची लक्षणं काही उमटत नाही. त्यासाठी पूर्वकाळीच्या आमूलाग्र संस्कार विधी ह्या आधुनिकतेच्या अंधारात गडप झालीत.
साधनं गोळा तर झालीत, आवश्यक ऊर्जा - स्थिरता सुद्धा आली; पण आठवते का हो तुम्हाला, का केलं एवढा खटाटोप? उद्देश विसरलात? कदाचित एक दिवस ही असली कधी न संपणारी उंदरांच्या स्पर्धेतून तुम्ही थकून माघार घ्याल आणि निसर्गाचे सर्व उत्तरं मिळवण्यासाठी - सहज सत्यासाठी तयार व्हाल; तेव्हा सत्य प्रकटू शकेल. तुमची सतत उपाशी होण्याच्या वृत्तिपासून पोट भरेल, आणि शेवटचं पोट भरण्याची भूक लागेल. आता हा क्षण तुमच्याकडे बघून आशा करत आहे की अंतिम शिटी वाजण्यापूर्वीच तो दिवस उगवावा.